(दापोली/ प्रतिनिधी)
आंबे देण्याच्या किरकोळ कारणावरून आत्या-भाच्यात झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना दापोली तालुक्यातील बुरोडी बाजारपेठ येथे घडली आहे. या प्रकरणी वृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी भाच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्पना एकनाथ काजारी (वय ७२, रा. बुरोडी बाजारपेठ, ता. दापोली) या जेष्ठ नागरिक असून त्यांना ब्रेन ट्युमरचा आजार असल्याची माहिती आरोपीस होती. असे असतानाही आंबे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरोपी केतन कमळाकर केळसकर (वय ३२, रा. बुरोडी बाजारपेठ) याने निष्काळजीपणे ढकलून देत शिवीगाळ केली. तसेच हाताच्या थपडा मारत डोके, डोळा आणि तोंडावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यावेळी फिर्यादी कल्पना काजारी तसेच त्यांची मुलगी पूजा चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार ४ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बुरोडी बाजारपेठ परिसरात घडला होता. या घटनेप्रकरणी दापोली पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १२५(अ), ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३२४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

