(दापोली)
शेतीचे काम करत असताना सर्पदंश झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिपक लक्ष्मण पवार (वय ३४, रा. कुडावळे आदिवासीवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना ११ जुलै रोजी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिपक पवार हे १० जुलै २०२५ रोजी सकाळच्या सुमारास शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना त्यांना सर्पदंश झाला. तातडीने त्यांना उपचारासाठी दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ११ जुलै रोजी सकाळी ८.४६ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यातही आवश्यक कागदपत्रांच्या आधारे आमू क्र. ४९/२०२५, भा.दं.वि. कलम १९४ अन्वये नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुडावळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.