(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे गायब असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी अधिकृत स्पष्टीकरण देत हा केवळ तांत्रिक आणि ‘क्लेरिकल’ स्वरूपाचा गोंधळ असल्याचे स्पष्ट केले आहे.
नेमका वाद काय?
राष्ट्रवादी काँग्रेसने 29 एप्रिल रोजी भारतीय निवडणूक आयोग कडे राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भातील सविस्तर यादी सादर केली होती. या यादीत राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. तसेच सरचिटणीस पदासाठी पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, पक्षाचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे यादीत नसल्याचे समोर आल्यानंतर अजित पवार गटात मोठे फेरबदल सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या.
सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण
या वादानंतर सुनेत्रा पवार यांनी X वर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की, “माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत तांत्रिक आणि क्लेरिकल चूक झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त करण्यात येईल.” या स्पष्टीकरणानंतर संबंधित नेत्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले नसून, तो प्रशासकीय गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ची शक्यता?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वादासोबतच बारामतीच्या राजकारणातही नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील तिसरी पिढी आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघात दौरे आणि जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली असून, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे.
जय पवारांचीही बारामतीत सक्रियता वाढली
दुसरीकडे जय पवार यांनीही बारामतीत गाठीभेटी वाढवल्या असून, जनता दरबाराच्या माध्यमातून ते सक्रिय झाले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे ते आगामी निवडणूक रिंगणात उतरू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. तसेच रोहित पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात रस दाखवत असल्याचे बोलले जात आहे.
पवार कुटुंबात राजकीय वर्चस्वाची चुरस?
कौटुंबिक स्तरावर पवार कुटुंब एकत्र असल्याचे सांगितले जात असले, तरी राजकीय पटलावर आगामी काळात वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी राष्ट्रीय कार्यकारिणीतील ‘तांत्रिक चूक’ दुरुस्त करून पक्षातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

