(गुहागर / वार्ताहर)
गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा-मधलीवाडी येथे बंद घराच्या पडवीत सुमारे पाच महिन्यांचा मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून, उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
पाचेरीसडा-मधलीवाडी येथील विठ्ठल देवजी डिंगणकर यांच्या बंद घराच्या पडवीत बिबट्या मृतावस्थेत असल्याचे श्रीमती गीता गणपत जोशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
पाहणीदरम्यान मृत बिबट्या मादी असून त्याचे वय अंदाजे पाच महिने असल्याचे आढळून आले. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेतला असून, नियमानुसार पुढील तपासणी व कार्यवाही केली जात आहे.
मनुष्यवस्तीतील बंद घराच्या पडवीतच बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत वनविभागाच्या तपासानंतर अधिकृत माहिती समोर येणार आहे.

