( ठाणे )
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात 30 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भटक्या श्वानाने चावा घेतल्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीत मानसिक तणाव वाढल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आढळून आला आहे. आयश विश्वनाथ अमीन (वय 30) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ही घटना कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका भागातील सहजीवन सोसायटी, बी विंग येथे घडली. आयश अमीन हे कुटुंबासह फ्लॅट क्रमांक 903 मध्ये वास्तव्यास होते. ते गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँकेच्या ठाणे शाखेत कार्यरत होते.
कुत्रा चावल्यानंतर भीती वाढली
काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात भटक्या कुत्र्याने आयश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मागील चार दिवसांपासून त्यांच्या वागण्यात व हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत होते, असेही कुटुंबीयांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आयशच्या वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले होते. पाणी पाहून भीती वाटण्यासह त्याच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याचे आढळून आले. रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालय येथे पाठवण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरव यांनी दिली.
पूर्ण लसीकरण अत्यावश्यक
कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा धोका टाळण्यासाठी पूर्ण लसीकरण वेळेत घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी पूर्ण उपचार आणि Anti-Rabies Vaccine घेतल्यास रेबिज पूर्णपणे टाळता येतो. भीती, गैरसमज किंवा लक्षणांबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. मानसिक तणाव वाढत असल्यास कुटुंबीयांनी भावनिक आधार देणे आणि आवश्यक असल्यास समुपदेशनाची मदत घेणे महत्त्वाचे असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भटक्या श्वानांचा धोका लक्षात घेऊन सावधगिरी बाळगावी आणि कुत्रा चावल्यानंतर रेबिजच्या लसीकरणाबाबत कोणतीही दिरंगाई करू नये.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावराबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाकडे होत आहे. अमीन यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

