(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील गलगंडाचे प्रमाण तसेच आयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या विकारांचा आढावा घेण्यासाठी गलगंड पुनर्सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ३० शाळांमधील इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण नुकतेच जिल्हा प्रशिक्षण केंद्रात पार पडले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथील प्रशिक्षक डॉ. विनायक भोई, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, रत्नागिरीचे डॉ. शरण काठोळे तसेच आरोग्य सहाय्यक शैलेश वाघाटे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोडीनची कमतरता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांचे प्रतिबंध व नियंत्रण करण्यावर भर दिला जातो. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील गलगंडाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी हे पुनर्सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये सर्वेक्षणाची कार्यपद्धती, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, आवश्यक माहितीचे संकलन, नोंदणी प्रक्रिया आणि अहवाल सादरीकरण याबाबत प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जिल्ह्यातील आयोडीनअभावी विकारांची सद्यस्थिती समजून घेण्यास मदत होणार आहे. या जिल्हास्तरीय प्रशिक्षणास जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक तसेच आरोग्य सेवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये आयोडीनअभावी विकारांचे प्रमाण वेळेत ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

