(मुंबई)
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सादर केला.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी होत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नियमानुसार, संसद आणि विधानसभेत एकाच वेळी निवडून आलेल्या व्यक्तीला १४ दिवसांच्या आत एका पदाचा राजीनामा देणे आवश्यक असते. त्यामुळे निकालानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली होती. त्यानंतर त्यांच्या खासदारकीच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर बारामतीतील विजय मिळाल्यानंतर त्यांनी औपचारिक निर्णय घेतला. या राजीनाम्यानंतर राज्यसभेतील रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या जागेवर कोणाची निवड होणार, याकडे राष्ट्रवादीसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अलीकडेच राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर विरोधातील २२ उमेदवार आणि ‘नोटा’ला मिळून केवळ ४८३७ मते मिळाली. या विजयाने २०१९ मध्ये अजित पवार यांनी नोंदवलेला मताधिक्याचा विक्रमही त्यांनी मोडला.
या विजयानंतर त्यांनी बारामतीकरांचे आभार मानत, विकासाची गती अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.

