(मुंबई)
शनिवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र-शनी युती दिसणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. रविवार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर चंद्र-शुक्र युती दिसणार आहे. तर सोमवार, १० फेब्रुवारीला मध्य आकाशात चंद्र-मंगळ युती दिसणार आहे.
साध्या डोळयांनी या युती पाहता येणार आहेत. त्यावेळी शनी ग्रह अंधुक दिसेल. मंगळ लालसर रंगाचा दिसेल. गुरू-शुक्र तेजस्वी दिसतील, असे सोमण यांनी सांगितले. सध्या रात्रीच्या प्रारंभी आकाशात मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह अगदी साध्या डोळ्यांनी दिसत असल्याचे सोमण यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, रात्रीच्या प्रारंभी पश्चिम आकाशात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात शुक्र-शनी दर्शन देतील. गुरू ग्रह रोहिणी नक्षत्रात मध्य आकाशात दिसेल तर पूर्व आकाशात पुनर्वसू नक्षत्रात लालसर रंगात मंगळ ग्रह दर्शन देईल. हे चार ग्रह साध्या डोळ्यांनी सर्वांना पुढील काही दिवस रोज पाहता येतील.
युरेनस आणि नेपच्यून साध्या डोळ्यांनी दिसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चार ग्रह एकाचवेळी दिसण्याची ही पर्वणी आहे. जर दुर्बीण असेल तर शुक्राच्या कला, शनीची वलये आणि गुरू ग्रहाच्या पंचाण्णव चंद्रांपैकी चार चंद्र दुर्बिणीतून निरीक्षण करता येतील.