(मुंबई)
पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे माजी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधून बाहेर पडल्यानंतर प्रशांत जगताप यांना विविध राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात आल्या होत्या. मात्र आपली पुढील राजकीय वाटचाल ही पुरोगामी विचारसरणी आणि संविधान मूल्यांना बांधील असलेल्या पक्षासोबतच असेल, अशी भूमिका त्यांनी सुरुवातीपासून स्पष्ट केली होती. त्यानुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भाजपसोबत जाणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी मान्य नसल्याचे सांगत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
संविधान रक्षणासाठी आणि पुरोगामी विचारांसाठी लढणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपण सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला शहरात बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आपल्या भाषणात प्रशांत जगताप म्हणाले, मी शाहू, फुले, आंबेडकर, गांधी आणि नेहरूंच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. ज्यांनी मला सुरुवातीच्या काळात संधी दिली आणि ज्यांच्यासोबत मी २६ वर्ष काम केलं त्या शरद पवार साहेबांचे आभार मानतो. माझं कधीही त्यांच्याशी भांडण किंवा वाद नाही. माझी विचारधारा ठाम आहे. माझी लढाई हि भाजपविरोधात आहे, माझी लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघविरोधात आहे, माझी लढाई धर्मीय आणि जातीय आतंकवाद करणाऱ्यांच्या विरोधात आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला.
देशात गुन्हेगारीत पहिला क्रमांक पुण्याचा आहे, भष्ट्राचारात पुणे आघाडीवर आहे, ट्राफिक कोंडीत पुणे देशात पाचव्या क्रमांकावर आहे, आणि हा केंद्राचा अहवाल आहे. या सगळ्याविरोधात माझा लढा आहे असं म्हणत प्रशांत जगताप यांनी रणशिंग फुंकले.

