(मुंबई)
मुंबई शहरातील वरळी परिसरात 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वप्नाली घेवीर असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची पुणे येथील होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नाली National Institute of Fashion Technology मध्ये फॅशन डिझाइनचे शिक्षण घेत होती. गेल्या चार महिन्यांपासून ती वरळीतील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये दोन महिलांसोबत राहत होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात तणावाचे वातावरण होते. या त्रासाला कंटाळून स्वप्नालीची आई सीमा या देखील मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या.
आत्महत्येपूर्वी आईला फोन; “मला कुणी फोन करू नका”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी स्वप्नालीचे वडील तिला वारंवार फोन करत होते. या त्रासामुळे तिने आईला फोन करून, “माझी परीक्षा आहे, मला कुणी फोन करू नका,” असे सांगितले होते. त्यावेळी आईने तिला फोन बंद करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मानसिक तणाव वाढल्यानंतर स्वप्नालीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रात्री आठच्या सुमारास तिने आईशी शेवटचे संभाषण केले होते. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास तिचा भाऊ सुबोध चिखले याने स्वप्नालीने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.
आत्महत्येपूर्वी वडिलांना व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी स्वप्नालीने वडिलांना व्हिडिओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच, मुलीच्या मृत्यूनंतर वडील सुनील घेवीर हे पत्नीच्या माहेरी गेले आणि धमकीवजा वर्तन केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. “आता स्वातीचाही असाच गेम करेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरळी पोलिसांकडून तपास सुरू
वरळी पोलीस ठाण्यात सुनील घेवीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास विविध अंगांनी केला जात आहे.

