( नाशिक )
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणारा अशोक एकनाथ खरात याला ३५ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएस अधिकारी तेवस्विनी सातपुते यांची या पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.
खरातविरोधात आणखी गुन्हेही दाखल झाले आहेत. सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच शिर्डी येथील पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हाही दाखल आहे. त्यामुळे त्याच्यावर एकूण तीन गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईत ५८ धक्कादायक व्हिडिओ आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. यामध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांशी अश्लील वर्तन करतानाचे व्हिडिओही समोर आले असून, यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. SIT पथक आता जप्त पेन ड्राइव्हमधील व्हिडिओ, संभाव्य इतर पीडित महिला, ट्रस्टचे आर्थिक व्यवहार तसेच खरातचे राजकीय आणि धार्मिक संबंध यांची सखोल चौकशी करणार आहे.
दरम्यान, खरातने गेल्या काही वर्षांत अंकशास्त्र आणि तथाकथित ‘लष्करी शिस्त’ याच्या माध्यमातून प्रभावशाली व्यक्तींशी संबंध प्रस्थापित करत सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता उभी केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील आलिशान बंगले, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, पाथर्डीतील ३० एकर जमीन, तसेच सिन्नर, ओझर विमानतळ परिसर आणि शिर्डी येथील कोट्यवधींच्या जमिनींचा समावेश आहे.
तसेच सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील त्याच्या फार्महाऊस आणि मंदिर परिसराचीही पोलिसांनी झाडाझडती घेतली. स्थानिकांच्या माहितीनुसार, या ठिकाणी अनेक राजकीय नेते आणि कलाकारांचा वावर असायचा. या सर्व घडामोडींमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, SIT चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

