(तेहरान)
मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला असून इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्यानं होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल वाहतूक मार्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कच्च्या तेलाच्या किमतींपेक्षा इराणला अण्वस्त्रे मिळण्यापासून रोखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
जगातील सुमारे एक चतुर्थांश कच्चे तेल आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू (LNG) वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. त्यामुळे हा मार्ग बंद राहिल्यास अनेक देशांच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. भारतासह अनेक देशांमध्ये तेल आणि गॅसच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली असली तरी केंद्र सरकारने सध्या पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्लाह मोज्तबा खामेनी यांनी होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सरकारी माध्यमांद्वारे जाहीर करण्यात आले. ते हवाई हल्ल्यात जखमी झाल्यानंतर अद्याप सार्वजनिकरित्या दिसलेले नसले तरी त्यांचा संदेश सरकारी दूरदर्शनवरून वाचून दाखवण्यात आला.
मध्यपूर्वेतील युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पुत्र मोज्तबा खामेनी यांची सर्वोच्च नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खामेनी यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले की, “होर्मुझ सामुद्रधुनी रोखण्याचा मार्ग वापरला पाहिजे.” अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर अजून पूर्ण झालेले नाही आणि ते इराणच्या प्राधान्यक्रमात राहील, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, इराणने आखाती प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची नवीन मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती आणखी चिघळल्यास जागतिक स्तरावर इतिहासातील मोठ्या तेलपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, “इराण या दुष्ट साम्राज्याला अण्वस्त्रे मिळू न देणे ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”

