( नवी मुंबई )
नवी मुंबईत खारघरजवळील तळोजा परिसरात घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही हत्या मुलीच्या मावशीच्या नवऱ्यानेच केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
काय आहे घटना?
तळोजा फेज 2 मधील आसावरी सोसायटीत 17 वर्षीय मुलगी आई-वडिलांसोबत राहत होती. आई स्वयंपाकाची कामे करत असल्याने ती घरी नसताना, 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाचच्या दरम्यान मुलगी एकटी होती. त्यावेळी आरोपी मोहम्मद अयुब साहिल मिस्त्री (45) तिच्या घरी आला.
सुरुवातीला त्याने त्या मुलीला आपल्या मुलाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. मात्र मुलीनं नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या मोहम्मद मिस्त्रीनं तिच्या डोक्यावर कुकरच्या भांड्याने हल्ला केला आणि मानेवर स्वयंपाकघरातील चाकूनं वार करून तिचा खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. संध्याकाळी आई घरी परतल्यानंतर तिला मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पुरावे आणि तपास
तळोजा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ व श्वानपथक पाचारण केले. रक्ताचे डाग लागलेला कुकर व चाकू जप्त करण्यात आला. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी रेनकोट घातलेला एक व्यक्ती दिसून आला; चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी नातेवाईकांनी तो मोहम्मद मिस्त्री असल्याचा संशय व्यक्त केला. याप्रकरणी सहा पथके तयार करून पोलिसांनी फक्त 12 तासांत आरोपीला उल्हासनगरहून अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
खूनामागचे कारण
पोलिस तपासातून धक्कादायक कारण समोर आले. आरोपीची पत्नी आणि पीडित मुलीची आई या बहिणी आहेत. दोघी गर्भवती असताना, जर एका घरी मुलगा आणि दुसऱ्या घरी मुलगी झाली, तर त्यांचे लग्न लावून देऊ, असे ठरले होते. मात्र काही काळानंतर आर्थिक वाद निर्माण झाले आणि नात्यात दुरावा आला. त्यामुळे ठरलेलं लग्न मोडण्यात आलं.
ही बाब कळताच आरोपी मोहम्मद मिस्त्री मानसिक तणावाखाली गेला. अखेरीस मुलीने प्रस्ताव नाकारल्याने त्याने थेट तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांनी सांगितले

