[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीचा कारभार बदलल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रियेला विलंब होत असल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी चौकीत कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता नव्याने कारभार हाकणाऱ्या पोलिसांकडून कामकाज सुरू आहे. मात्र, या बदलानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर नातेवाईकांना तासन्तास, तर काही वेळा दिवसभराचा वेळ ताटकळत काढावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
यापूर्वी केवळ दोन पोलिस कर्मचारी असतानाही पोलिस चौकीचे कामकाज सुरळीत आणि विनातक्रार सुरू होते. दोनच कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये आणि कामकाज अधिक गतिमान व्हावे, या उद्देशाने शहर पोलिसांकडून आणखी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता चौकीत एकूण तीन पोलिस कर्मचारी आहेत. मात्र पोलिसांची संख्या वाढूनही कामाचा वेग वाढण्याऐवजी नातेवाईकांची प्रतीक्षा वाढत असेल, तर अतिरिक्त मनुष्यबळ असताना सुद्धा विलंब का होतोय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शवविच्छेदनासाठी सकाळी मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर दिवसभर पोलिसी प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहावी लागली आणि त्यानंतर संध्याकाळी शवविच्छेदन झाले, तर पुढील सर्व सोपस्कारांचा वेळापत्रकच कोलमडते. पावसाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी मृतदेह गावाकडे नेणे, वाहतुकीची व्यवस्था करणे आणि त्यानंतर अंत्यविधी करणे नातेवाईकांसाठी मोठे आव्हान ठरते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांबरोबरच गाव-वाडीतील नातेवाईक आणि आप्तेष्टही या प्रक्रियेत सहभागी असतात. पोलिसी दिरंगाईमुळे या सर्वांचा वेळ वाया जात असून, आधीच दुःखाच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबीयांना प्रशासनाच्या विलंबाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, शवविच्छेदनाची प्रक्रिया ही पोलिस आणि डॉक्टर यांच्या समन्वयाने पूर्ण होत असल्याने विलंबाचे नेमके कारण कोणत्या टप्प्यावर आहे, हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या नावावर पोलिसी दिरंगाई झाकली जात आहे का, की प्रत्यक्ष वैद्यकीय प्रक्रियेलाच वेळ लागत आहे? याबाबत संबंधितांनी स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. जुन्या कर्मचाऱ्यांची बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांनी कारभार स्वीकारला आहे. मात्र, ‘पूर्वीचेच बरे होते’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येत असेल, तर ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
रुग्णालयातील पोलिस चौकीला अतिरिक्त पोलिस कर्मचारी देण्यामागचा उद्देश स्पष्ट होता की, कामकाज गतिमान करणे आणि नातेवाईकांची गैरसोय टाळणे. मात्र प्रत्यक्षात जर मृतदेह शवविच्छेदनासाठी ताटकळत ठेवले जात असतील, तर या व्यवस्थेचे पुनरावलोकन कोण करणार? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. मृत्यूच्या दुःखात असलेल्या नातेवाईकांना शवविच्छेदनाच्या नावाखाली दिवसभर रुग्णालयाच्या आवारात ताटकळत ठेवणे ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून मानवी संवेदनशीलतेचीही परीक्षा आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारींची तातडीने दखल घेऊन सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीतील कामकाजाची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी होत आहे.

