( मुंबई )
“यंदा मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, महापौर महायुतीचाच होणार,” असे विधान करत भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
“मुख्यमंत्री देवाभाऊंनी दाखवलेला बीएमसी निवडणुकीतील विजयाचा हा ‘नेक्स्ट लेव्हल कॉन्फिडन्स’ मतदार यादी, ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात नसती तर आला नसता,” असा घणाघात रोहित पवारांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “काहीही झाले तरी मुंबईत महायुतीचाच महापौर बसणार अशी घोषणा करून फडणवीसांनी केवळ विरोधकांनाच नाही तर आपल्या मित्रपक्षांनाही इशारा दिला आहे. ‘सोबत आलात किंवा नाही आलात, तरी आम्हीच जिंकणार,’ असा दम त्यांनी भरला आहे.”
रोहित पवार पुढे म्हणाले, “हा आहे भाजपाचा अक्राळविक्राळ चेहरा. आता भाजपाच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेले भाई आणि दादा खरा स्वाभिमान दाखवतात की मान कापली जाईल या भीतीने भाजपच्या मागे फरपटत जातात, हे आता लवकरच समजणार आहे.”
काय म्हणाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पक्षाच्या “विजय संकल्प” मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले होते की, काही लोक स्वत:ला ब्रँड म्हणवतात, पण आमच्या शशांक राव आणि प्रसाद लाडांनी बेस्टच्या निवडणुकीत त्यांचा बॅण्ड वाजवला. ब्रँड फक्त बाळासाहेब होते. दुसरे कोणी ब्रँड होऊ शकत नाही असा टोला त्यांनी लगावला. आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड झाला, नरेंद्र मोदी हा जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे असे ते म्हणाले.
गेल्या वेळी शिवसेनेचा महापौर व्हावा अशी उद्धवजी यांची इच्छा होती. आपण क्षणाचाही विलंब लावला नाही. आपण सगळ्यांना बोलवले, तेव्हा एक पाऊल मागे घेऊन त्यांना महापौर दिले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष सगळे तुम्ही घ्या. आम्ही विरोधक म्हणून काम करणार नाही, पण जर तुम्ही कुठे चुकला तर आम्ही अंकुश ठेऊ असे सांगितले. पण २०१९ ची निवडणूक आली आणि मग मला गाणे गावे लागले “अछा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का…”
आम्ही लढणारे आहोत रडणारे नाही. २०२२ ला आम्ही गनिमी कावा दाखविला आणि २०२४ ला आम्ही पूर्ण बहुमताचे सरकार आणले. काहीही झाले तरी, कोणी सोबत आले तरी आणि आले नाही तरी मुंबईत महायुतीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.

