(अहमदाबाद)
अहमदाबादमध्ये नुकताच एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ चा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून सर्वच स्तरांवर चौकशीला गती देण्यात येत आहे. अशातच विमान सुरक्षा क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी या अपघातावर गंभीर भाष्य करत हा अपघात जाणीवपूर्वक मानवी कृतीमुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
“हा अपघात अपघाती नसून नियोजनबद्ध असू शकतो” – कॅप्टन रंगनाथन
कॅप्टन रंगनाथन यांनी अपघाताच्या चौकशीतील दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं – फ्युएल कटऑफ स्विचेस आणि कॉकपिट ऑडिओ रेकॉर्डिंग. त्यांच्या मते, हे स्विचेस स्वतःहून बंद होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ते फक्त वैमानिकाच हाताने जाणीवपूर्वक बंद करू शकतो. त्यामुळे या घटनेत फ्युएल कटऑफ जाणीवपूर्वक केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाचे प्रश्न आणि तज्ज्ञांची उत्तरं
प्रश्न : एखाद्या वैमानिकाने जाणूनबुजून फ्युएल बंद केले असावे का?
उत्तर : होय, निश्चितच. अशी कृती केवळ मानवी हस्तक्षेपामुळेच शक्य आहे.
प्रश्न : फ्युएल कटऑफ मॅन्युअली करावं लागतं का?
उत्तर : होय. फ्युएल सिलेक्टर्स स्लायडिंग प्रकारचे नसतात, त्यामुळे ते वीज गेल्यानं किंवा अपघाताने आपोआप बंद होण्याची शक्यता नसते. हे सिलेक्टर्स एका विशिष्ट स्लॉटमध्ये असतात आणि त्यांना हलवण्यासाठी ते बाहेर खेचूनच वर/खाली हलवावे लागते. त्यामुळे यामध्ये जाणीवपूर्वक हस्तक्षेपाची शक्यता अधिक आहे.
प्रश्न : फ्युएल कंट्रोल स्विच कोण चालवतो?
उत्तर : फक्त वैमानिकच या स्विचेस ऑपरेट करू शकतो. इंधन नियंत्रणाच्या या प्रणालीमध्ये चूक होण्याची शक्यता अत्यल्प आहे.
प्रश्न : स्विचेस आपोआप बदलू शकतात का?
उत्तर : नाही. हे स्विच आपोआप बदलत नाहीत. वीज गेली तरीही ते ‘बंद’ स्थितीत जात नाहीत, कारण त्यांना बाहेर खेचून विशिष्ट हालचाल करावी लागते. त्यामुळे अशा गोष्टी अनवधानाने घडण्याची शक्यता जवळपास नाहीच.
चौकशी अधिक कठोर आणि निष्पक्ष असावी – तज्ज्ञांची मागणी
कॅप्टन रंगनाथन यांनी या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे पारदर्शक आणि कठोर चौकशीची मागणी केली आहे. त्यांच्या या निरीक्षणामुळे या प्रकरणात मानवी हेतूचा संभाव्य हस्तक्षेप समोर आला असून, चौकशीला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

