(सांगली)
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात भीषण दुर्घटना घडली असून, वादळी वाऱ्यामुळे चिरा-विटांची भिंत कोसळून सहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मुरुगबाई देवीच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने भाविक जमले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी अनेक भाविक जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी थांबले होते. याचवेळी प्रचंड वाऱ्यामुळे मोठे पत्र्याचे शेड उडून थेट चिरा-विटांच्या भिंतीवर आदळले. त्यामुळे भिंत कोसळून खाली उभ्या असलेल्या भाविकांवर मलबा पडला आणि भीषण दुर्घटना घडली.
मृतांमध्ये महिला, वृद्ध आणि अल्पवयीनांचा समावेश
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची प्राथमिक ओळख पुढीलप्रमाणे समोर आली आहे :
- मंगल भाऊसाहेब मोठे (वय 45, पाडोंझरी)
- अरुण विजय गेजगे (वय 14, डोमनाळ)
- सोनू लक्ष्मण गेजगे (वय 14, डोमनाळ, विजयपूर, कर्नाटक)
- कोंडीबा साऊबा गेजगे (वय 65, दरीबडची)
- संजुबाई राम चौधरी (वय 51, टक्कळकी, कर्नाटक)
- शंकर आबा लोखंडे (वय 75, दरीबडची)
15 जखमींवर उपचार सुरू
या दुर्घटनेत दर्याप्पा नागा कोकरे, मुर्शिद पुजारी, मरीबा नागा कोकरे, संजू आप्पासो एवळे, शिवा गेजगे, कोंडीबा बिरा गेजगे, बिरू विजू गेजगे यांच्यासह अन्य भाविक जखमी झाले आहेत. जखमींना मिरज, संख आणि विजयपूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निकृष्ट बांधकामामुळे दुर्घटना? स्थानिकांकडून आरोप
दरम्यान, ज्या ठिकाणी भाविकांनी आसरा घेतला होता ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्याचा तडाखा बसताच भिंत कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेमुळे जत तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया
गोपीचंद पडळकर यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सांगितले की, मुरुगबाई देवी यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर अत्यंत दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे. वादळी वारा आणि पावसामुळे भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि आरोग्य विभागाशी संपर्क साधून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

