(सांगली)
शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय–रेल्वे स्टेशन मार्गावर रविवारी रात्री हिट-अँड-रनचा धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात कार चालवत विरुद्ध दिशेने आलेल्या चार ते पाच वाहनांना चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह 12 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित कारची तोडफोड केली.
जखमींची नावे: संतोष झवर (51), पिडाण्णा मद्रासी (50), आयुष माने (9), अनिता खोकरे (40), अविनाश माने (45), अन्वी माने (5), नीलेश मिस्त्री (42), रेणुका मिस्त्री (39), स्वाती विश्वकर्मा (39), रिद्धी पिराळे (12), आरती माने (29) आणि राजेश पिराळे (45).
अपघात कसा घडला?
रात्री सुमारे 9 वाजता संतोष झवर हा कॉलेज कॉर्नरकडून कल्पतरू मंगल कार्यालयाच्या दिशेने भरधाव कार चालवत होता. नशेत चुकीच्या दिशेने येत त्याने समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत अनेक मोटारी व दुचाकींचे मोठे नुकसान झाले. कारची एअरबॅग उघडल्याने चालकाचे प्राण वाचले. मात्र घटनास्थळावरील नागरिकांनी तत्काळ पाठलाग करून त्याला पकडले व चांगला चोप दिला. काहींनी कारवर दगडफेकही केली.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस तुकडी तातडीने पोहोचली. जखमींना नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी समजताच जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अपघातात लहान मुलांसह एकूण 12 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. काहींना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर एका मुलीच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

