(संगमेश्वर / एजाज पटेल)
गेल्या चार दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान घडवून आणले. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, वीजवाहिन्या तुटल्या, तर मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घरांची आणि गोठ्यांचीही पडझड झाली. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका परचुरी गावालाही बसला. मुख्य वीज खांब कोसळल्याने आणि वीजवाहिन्या तुटल्याने शिगवण वेल्येवाडी, चंद्रकरवाडी आणि दुदमवाडी हे भाग सलग तीन दिवस अंधारात होते.
परिस्थितीची छायाचित्रे आणि संघर्षाच्या चित्राफिती वृत्तपत्रे तसेच समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर महावितरण विभागाने तातडीने दखल घेत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली.
ही आपत्ती महावितरणसाठीही मोठे आव्हान ठरली. तालुकाभर एकाच वेळी वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याने मनुष्यबळावर ताण निर्माण झाला होता. तरीदेखील पावसाची, काळोखाची आणि रणरणत्या उन्हाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रानावनात उतरून काम करत होते. विशेषतः परचुरी गावाला नदीपलीकडील राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे येथून वीजपुरवठा केला जात असल्याने नदीपात्रात कोसळलेल्या वीजवाहिन्या पुन्हा ओढणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते.
प्रखर उन्हात अंगातून घामाच्या धारा वाहत असतानाही महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी खांद्याला खांदा लावून हे आव्हान पेलले. विजेअभावी गावातील नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाली होती. महिलांना भर उन्हात दूरच्या विहिरींवर पाण्यासाठी जावे लागत होते, तर उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या कठीण काळात परचुरीतील ग्रामस्थांनी महावितरण कर्मचाऱ्यांना दिलेली साथ मोलाची ठरली. वसंत भाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच प्रदीप चंदरकर, सुहास घाणेकर, ऋषी मिस्त्री, संजय चंदरकर, विजय चंदरकर, प्रदीप वेलये, प्रीतम शिगवण, संपदा अर्जुन शिगवण, वैभव धाडसे, आकाश धुमक आणि दीपक वेल्ये यांनी भर उन्हात जीवाची पर्वा न करता श्रमदान केले.
महावितरण कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्यातील या समन्वयामुळे नदीपात्रातील वीजवाहिन्या ओढण्याचे कठीण काम अखेर पूर्ण झाले. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे चौथ्या दिवशी सायंकाळी गावात पुन्हा वीज परतली आणि अंधारात बुडालेल्या वाड्यावस्त्या उजळून निघाल्या. नैसर्गिक संकटावर मात करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी झटणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या परचुरीतील तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विनायक शिगवण यांची भावना व्यक्त करणारी प्रतिक्रिया
या संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलताना स्थानिक नागरिक विनायक शिगवण यांनी भावनिक शब्दांत महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती होती. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी वीज खांब वाकणे, कोसळणे आणि वीजवाहिन्या तुटणे अशा असंख्य घटना घडल्या. उपलब्ध मनुष्यबळाच्या मर्यादा असूनही महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. उद्या स्वतःचे काही बरेवाईट झाले तर कुटुंबावर संकट येईल, याचीही पर्वा त्यांनी केली नाही.”
ते पुढे म्हणाले, “विजवितरणचे कर्मचारीही शेवटी माणूसच आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, त्यांची वाट पाहणारी माणसं आहेत. तरीही ग्राहकांच्या घरात पुन्हा प्रकाश यावा म्हणून त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. पावसात, चिखलात आणि आता भर उन्हात काट्याकुट्यातून फिरत काम करताना त्यांचे हाल होत होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, पण लोकांच्या घरात उजेड परतावा यासाठी त्यांची धडपड सुरू होती. रक्ताचे पाणी करून दुसऱ्यांच्या घरात प्रकाश पेरण्यासाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कष्ट शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.”

