(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण सहभाग, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत कुडवली येथील सूरज संतोष जाधव यांची राष्ट्रीय दलित पॅंथर सेनाच्या कोंकण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कोंकणातील संघटनात्मक कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सूरज जाधव हे सूरज क्रिकेट अकॅडमीचे क्रिकेट प्रशिक्षक असून, ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, संघटनशक्ती आणि सकारात्मक नेतृत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय दलित पॅंथर सेनेचे संस्थापक व अध्यक्ष टिपू पटवेगार यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा वसीम शेख यांच्या हस्ते सूरज जाधव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस वसीम भाई तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कोंकण विभागात सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी तसेच युवकांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी सूरज जाधव प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना सूरज जाधव यांनी, “संघटनेला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि नवा आवाज” हे ध्येय प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. कोंकणातील वंचित, शोषित आणि पीडित घटकांच्या न्यायहक्कांसाठी संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्याबरोबरच युवकांना सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, या नियुक्तीनंतर विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सूरज जाधव यांचे अभिनंदन करत त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

