( नाशिक )
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता गंभीर आणि नवे वळण घेतले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) नुकतीच त्यांची सविस्तर चौकशी केली असून, या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे मिळाल्याची चर्चा आहे.
अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. प्राथमिक तपासात या कथित रॅकेटमधून तब्बल ७० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या व्यवहारांसाठी अनेक बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याचेही तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.
या आर्थिक व्यवहारांशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित व्यवहारांमध्ये त्यांचा थेट अथवा अप्रत्यक्ष सहभाग होता का, याचा आता सखोल तपास सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी एसआयटीने नाशिकमध्ये रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी केली. चौकशीदरम्यान विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून, काही आर्थिक व्यवहार, संस्थांशी संबंधित नोंदी आणि संपर्कांची माहिती तपास अधिकाऱ्यांनी पडताळून पाहिल्याचे समजते.
एसआयटीच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील हालचाली सुरू केल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मनी लाँड्रिंग, आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या कथित बेकायदेशीर वापराबाबत स्वतंत्र तपास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ‘शिवनिका’ नावाची संस्था देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या संस्थेमध्ये रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेची चौकशी सुरू असून, अशोक खरातकडून कथितरीत्या जमा करण्यात आलेल्या पैशांचे व्यवहार या संस्थेमार्फत झाले का, तसेच आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी काही मदत करण्यात आली का, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय या व्यवहारांचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांपर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू असल्याने या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडीकडून पुढील काही दिवसांत चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेने थेट या तपासात सहभाग घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. चौकशीत ठोस पुरावे समोर आल्यास रूपाली चाकणकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

