(मुंबई)
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित विमान कंपनीसह जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या या याचिकेत विमान अपघातामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यामागे घातपाताची शक्यता आहे, याचाही तपास व्हावा, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत पुढे असेही म्हटले आहे की, या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संबंधित विमान कंपनी किंवा मालकांविरोधात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी बारामती पोलिसांना विशेष सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या सोमवारी तातडीची सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हेमंत पाटील यांनी सांगितले.
कसा झाला विमान अपघात?
२८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे जाण्यासाठी अजित पवार यांचे विमान सकाळी ८.१० वाजता मुंबई येथून उड्डाण केले होते. सुमारे ४० मिनिटांत विमान बारामती विमानतळाजवळ पोहोचले. मात्र लँडिंग करताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. अखेरीस विमान धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळले. या दुर्घटनेनंतर मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कोपायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

