(संगमेश्वर / साखरपा)
आंबा घाट परिसरात हरवलेली दुचाकीस्वाराची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देत पत्रकार संतोष पोटफोडे यांनी सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडविले. त्यांच्या या कृतीमुळे परिसरात कौतुकाची भावना व्यक्त होत असून, प्रामाणिकपणा अजूनही समाजात जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे.
आंबा घाटातून प्रवास करत असताना एका दुचाकीस्वाराची बॅग रस्त्यालगत पडलेली असल्याचे संतोष पोटफोडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बॅग उघडून पाहणी केली असता त्यामध्ये सुमारे ६ हजार १०० रुपयांची रोख रक्कम, मोबाईल फोन, चार्जर, कपडे तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. कोणताही विलंब न करता त्यांनी ही बॅग साखरपा पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केली. पोलिसांनीही तत्परता दाखवत बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेत त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हरवलेली बॅग आणि त्यातील सर्व साहित्य संबंधित व्यक्तीकडे सुखरूप परत करण्यात आले. अचानक हरवलेले साहित्य पुन्हा मिळाल्याने दुचाकीस्वाराने समाधान व्यक्त करत पत्रकार पोटफोडे आणि पोलिसांचे आभार मानले.
पत्रकारितेसोबतच रिक्षा व्यवसाय करणारे संतोष पोटफोडे हे सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. धडाडीचे पत्रकार म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे समाजात त्यांच्याविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली आहे. या वेळी पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघाटे तसेच पोलिस अंमलदार नितीन जाधव उपस्थित होते. नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या अशा घटनांचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

