(सावंतवाडी)
आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या परिसरात एका डंपर चालकाने तब्बल 1200 फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजाराम रघुनाथ कुडतरकर (वय 31, रा. आंबोली गावठणवाडी) असे मृत चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम याने घाटात आपला डंपर उभा करून दरीत उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित डंपर एक रात्रभर घाटात उभाच असल्याने डंपर मालक मायकल डिसोजा यांना संशय आला. त्यांनी ड्रोनच्या सहाय्याने घाट परिसराची पाहणी केली असता सुमारे 1200 फूट खोल दरीत राजाराम याचा मृतदेह आढळून आला. ड्रोन कॅमेऱ्यात सुरुवातीला फक्त हात आणि पाय दिसून येत होते.
घटनेची माहिती मिळताच सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. टीमचे सदस्य उत्तम नार्वेकर, मायकल डिसोजा आणि प्रथमेश गावडे यांनी जीव धोक्यात घालून खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला. यावेळी राजू राऊळ, राकेश अमृस्कर, दिपक मेस्त्री, फास्कू देसा, गुरु सावंत, संतान अल्मेडा, सहदेव सनाम, अमरेश गावडे आणि रमेश मोहीते यांनीही मदतकार्य केले.
राजाराम याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र पत्नीपासून विभक्त राहत असल्याने तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
स्थानिकांच्या मते, राजाराम हा अत्यंत शांत, मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारा स्वभावाचा होता. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार मनीष शिंदे हेही घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास सुरू आहे.

