(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वरनजीक निढळेवाडी येथे हाॅटेल मैत्री पार्क समोरील खोदकाम माहे नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आले. या कामामुळे समस्त निढळेवाडीवासीयांची महामार्गावर येण्याची ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेली पाखाडी नष्ट झाली. ही बाब ग्रामस्थांनी त्याचवेळी संबंधित कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निदर्शनात आणून दिली होती. संबधित अधिकाऱ्यांनी तातडीने संरक्षक भिंत व पाखाडी बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासणाची पूर्तता करणार कधी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणामध्ये पुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिनांक 01.07.2023 रोजी नागरिकांच्या वतीने पुन्हा पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती. तसेच मा. पालकमंत्री उदय सामंत यांनी दिनांक 07.08.2023 रोजी त्यांचे पत्र जा.क्र./मंत्री/उद्योग/सर्वसाधारण /1512/2023 ने उचित कार्यवाहीचे आदेश दिले होते. शिवाय तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिनांक 06.09.2023 रोजी हायवे पाहणी दौऱ्यावेळी सरपंचांसह ग्रामस्थांनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मंत्री चव्हाण यांनी त्यावेळी नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय त्याच दिवशी सा. बां. अभियंता कुलकर्णी यांनीही स्वतः दूरध्वनीवरून आश्वासन दिले होते. या अधिकाऱ्याने आश्वासन देऊन वर्ष दोंन वर्ष उलटले तरीही कार्यवाही होत नसेल तर अधिकारी कार्यवाही करण्यासाठी आहेत की, आश्वासने देण्यासाठी आहेत असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. निर्ढावलेल्या अधिकाऱ्याने पालकमंत्री तसेच तत्कालीन मंत्री यांच्या आदेशालाही हरताळ फासला असल्याचे चित्र आहे.
येथील ग्रामस्थांना पायी चालायला वाट नसल्याने व पावसाळ्यात निसरडे रस्ता झाल्याने अपघात होऊ लागले होते. यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरती व्यवस्था करून घेतली, तसे कार्यकारी अभियंता जाधव यांना कळविले होते. मात्र तत्पूर्वीच त्यांची नगरला बदली झाली. असे असताना सुद्धा ग्रामस्थांनी केलेल्या कामासाठी फाडीच्या खर्चाची रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून दिली. उपाययोजना केल्यानंतरही आज रस्त्यावर उतरण्यासाठी त्रासदायक होत आहे. याबाबत संबधित विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांना ग्रामस्थ अनेकदा भेटले, परंतु त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
दोन वर्षे उलटूनही विभागाकडून साधे उत्तर नाही
तसेच रस्त्यावर व्हिलेज बोर्ड लावले नसल्याने प्रवासासाठी नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांकडून आलेल्या निवेदने वा तक्रारीवर पंधरा दिवसात कार्यवाही करावी असे ऑफिसच्या फलकावर दिसून येते. दोन वर्षे उलटूनही विभागाकडून ग्रामस्थांनी दिलेल्या पत्राचे साधे उत्तरही देण्यात आलेले नाही. जे कार्यालयीन कार्यपद्धतीविरुद्ध आहे. अशा तक्रारीचा निपटारा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. तरच प्रशासकीय अधिकारी वर्गाला शिस्त लागेल. मात्र तसे होताना दिसत नाही.
अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी…
यासोबत निढळेवाडीवासीयांच्या मागणीचा विचार करून पालकमंत्री उदय सामंत आणि तत्कालीन मंत्री चव्हाण यांनी देखील उचित कार्यवाही करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला आदेश दिले होते. मात्र दिलेल्या आदेशांना ही अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. कार्यवाही करण्याचे आदेश धुडकावून लावणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन निढळेवाडी वासीयांसाठी महामार्गावर पोहोचण्याची तसेच व्हिलेज बोर्ड लावण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.