(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले पाचल गाव सध्या वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. मुंबईहून पुणे, मलकापूर, अनुस्कुरा, पाचल मार्गे मालवण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
यातच पाचल बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांकडून रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या समस्येची दखल घेत राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आज पाचल बाजारपेठेत स्वतः पेट्रोलिंग करत वाहतुकीची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करण्यात आलेली वाहने तात्काळ हटवण्यात आली. तसेच वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या आणि बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या कारवाईमुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. यावेळी ट्रॅफिक हवालदार रामदास पाटील हे देखील पेट्रोलिंग मोहिमेत सहभागी झाले होते.

