(राजापूर / तुषार पाचलकर)
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग, शिस्त आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. गावातील इंचभर जमीनही गावाबाहेर विकू नका, कारण ही जमीनच भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हायला हवा; केवळ मनोरंजन म्हणून त्याचा वापर झाला तर समाजाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आदर्श सरपंच व पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांनी केले.
समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ, गांगणवाडी यांच्या वतीने आयोजित “यशोगाथा ग्रामविकासाची” या विशेष कार्यक्रमात ग्रामविकासासाठी कार्य करणाऱ्या ग्रामविकास शिलेदारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक आण्णा सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक मठकर व सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्य उमेश पराडकर, अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या औचित्याने परिसरातील आजी-माजी सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोपटराव पवार यांनी लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हा गावाच्या विकासाचा मुख्य पाया असल्याचे सांगितले. योग्य नियोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि प्रामाणिक नेतृत्व या माध्यमातून कोणतेही गाव प्रगत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोकणात येणे नेहमीच आनंददायी वाटते. पूर्वी अखंड रत्नागिरी जिल्हा असताना देखील येथे येण्याचा योग यायचा. निसर्गसंपन्न कोकणामुळे बाहेरील लोकांना येथे यावेसे वाटते; मात्र कोकणातील माणसाला रोजगारासाठी बाहेर जावे लागते. भविष्यात “चाकरमानी” हा शब्दच पुसून टाकण्याची वेळ येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाढते तापमान, बेसुमार जंगलतोड आणि वाढते औद्योगिकीकरण यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिकचा वाढता वापर ही जगासमोरील गंभीर समस्या ठरत असून त्यावर आळा घालणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवरे बाजारच्या विकासप्रवासाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २६ जानेवारी १९९० रोजी प्रथम सरपंच झालो तेव्हा ग्रामपंचायतीचे उत्पन्न केवळ ३५० रुपये होते. मात्र लोकसहभाग, श्रमदान आणि शिस्त याच्या बळावर गावात वृक्षलागवड, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. गावात दारूबंदी लागू करण्यात आली तसेच शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर देण्यात आला.
गावात सामाजिक शिस्त प्रस्थापित करण्यात आली असून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसावा, हरिपाठ व व्यायाम सक्तीचा असावा, अशा उपक्रमांमुळे सामाजिक वातावरण सकारात्मक झाले. त्यामुळेच हिवरे बाजार हे देशातील आदर्श गाव म्हणून ओळखले जाऊ लागले, असे त्यांनी सांगितले.
कोकणाला दैदीप्यमान इतिहास लाभला आहे. येथील गावेही आदर्श गावे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ग्रामविकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

