(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मे महिन्याची उन्हाळी सुट्टी सुरू होताच मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरांत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची पावले पुन्हा गावाकडे वळू लागली आहेत. परिणामी मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे, एसटी स्थानके तसेच सीएनजी पंपांवर प्रचंड गर्दीचे चित्र निर्माण झाले असून प्रवाशांना वाहतूक कोंडी, उष्म्याचा त्रास आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक मंदावलेली दिसत आहे. रखडलेल्या महामार्ग कामांमुळे काही भागांत कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यातच काही सीएनजी पंपांवर गॅस उपलब्ध नसल्याने उपलब्ध पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी वाहनचालकांमध्ये बाचाबाचीचे प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे. कोकण रेल्वेवरही विक्रमी गर्दीचा ताण दिसून येत आहे. उन्हाळी हंगामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही स्पेशल गाड्या सुरू केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत असल्याची प्रवाशांची भावना आहे. यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशललाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून गाड्यांमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र आहे.
पनवेलहून गावाकडे जाण्यासाठी अनेक प्रवासी प्रथम दिव्यापर्यंत उलटा प्रवास करून तेथून मेमू पकडत असल्याने दिवा स्थानकावर अतिरिक्त गर्दी होत आहे. परिणामी अनेक चाकरमान्यांना बालगोपाळांसह तासन्तास उभे राहून प्रवास करावा लागत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता आणखी विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. एसटी महामंडळानेदेखील अतिरिक्त बससेवा सुरू केली असली तरी त्यालाही मोठी गर्दी होत आहे. प्रखर उन्हात बसस्थानकांवर प्रतीक्षा करताना प्रवाशांची गैरसोय होत असून अनेकांना आरक्षण मिळत नसल्याने ऐनवेळी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान, खासगी आराम बस आणि अन्य प्रवासी वाहनांनाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही खासगी वाहनधारकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. गणेशोत्सव, शिमगोत्सव आणि उन्हाळी सुट्टी या काळात कोकणाशी असलेली नाळ पुन्हा घट्ट होत असल्याचे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही पाहायला मिळत आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने अधिक नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त होत आहे.
प्रशासनाचे नियोजन कोठे हरवले?
उन्हाळी सुट्टी, गणेशोत्सव किंवा शिमगोत्सव काळात कोकणात प्रवाशांची गर्दी वाढते, हे नवीन नाही. दरवर्षीची हीच परिस्थिती असतानाही प्रशासनाकडून पुरेसे नियोजन होत नसल्याची तीव्र नाराजी चाकरमान्यांतून व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, अपुऱ्या स्पेशल गाड्या, सीएनजी तुटवडा आणि एसटी सेवांची मर्यादित क्षमता यामुळे प्रवाशांना अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कोकणवासीयांच्या भावनिक गावप्रवासाकडे प्रशासन केवळ हंगामी गर्दी म्हणून पाहत असल्याचा आरोप होत असून, “सण आला की गोंधळ आणि प्रवाशांचा खोळंबा” हेच चित्र कायम राहणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

