(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल संदर्भातील गुन्हे रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने 22 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक लांजा उपविभागात गस्त घालत असताना, राजापूर पोलीस ठाणे हद्दीतून गगनबावडा घाट मार्गे अवैधरित्या गोवंश वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज (23 सप्टेंबर) रोजी पाचल येथे वाहन तपासणी मोहिम राबवण्यात आली.
या तपासणीदरम्यान MH-08-AP-0254 क्रमांकाच्या टाटा वाहनातून तब्बल 13 गोवंश जनावरे दाटीवाटीने, पाणी-खाद्याविना व छळ होईल अशा अवस्थेत बांधलेली आढळली. चालकाकडे कोणताही वाहतूक परवाना अथवा पशुवैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाले.
तपासात चालक मलमान मुस्ताक बलवले (वय 35, रा. वलवले मोहल्ला, राजापूर) व सोबतीचा संजय दत्तराम पाटणकर (वय 48, रा. कुंभवडे रामणवाडी, राजापूर) यांनी तळगाव कोंडे येथील काजी मोहम्मद उर्फ पांड्या यांच्याकडून ही जनावरे आणली असल्याचे सांगितले.
या तिघांविरोधात प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, मोटार वाहन कायदा 1988 तसेच प्राण्यांची वाहतूक नियम 1978 यांसह विविध कायद्यांनुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईदरम्यान एकूण 2 आरोपींना अटक करण्यात आली असून ₹12,05,000 किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. तसेच 13 गोवंश जनावरांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार – सुभाष भागणे, नितीन डोमणे, पालकर, कदम व प्रवीण खांबे यांनी केली.

