(राजापूर / प्रतिनिधी)
सौंदळ मुसलमानवाडी (ता. राजापूर) येथील अस्लम नरमोहम्मद मोटलानी (वय ५९) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना दि. ६ जुलै २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मोटलानी हे गेल्या काही वर्षांपासून डायबेटीज व उच्च रक्तदाबाच्या त्रासाने पीडित होते. तसेच त्यांना एक वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका देखील आला होता. दि. ६ जुलैच्या पहाटे १२.३० च्या सुमारास त्यांच्या छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय ओणी, ता. राजापूर येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे उपचार सुरू करत ECG केली असता, हृदयाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरीकडे हलवले जात होते.
मात्र रस्त्यातच त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने रुग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांनी कोणताही शारीरिक प्रतिसाद देत नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, लांजा येथे आणण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ४.४५ वाजता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून (आ.मृ.क्र. ३७/२०२५), मृत्यूचे वैद्यकीय कारण myocardial infarction (हृदयविकाराचा तीव्र झटका) असे नमूद करण्यात आले आहे. मोटलानी यांच्या मृत्यूमुळे सौंदळ मुसलमानवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.