(नाणीज/ वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे गावचे रहिवासी तसेच नाणीज शिक्षणोत्तेजक मंडळाचे संस्थापक, आदर्श मुख्याध्यापक आणि रत्नागिरी जिल्हा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार विजेते श्री. रामकृष्ण विठ्ठल कात्रे यांचे सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता दुःखद निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी ठाणे येथे आपल्या मुलाच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माध्यमिक विद्यामंदिर नाणीज ही प्रशाला उभारण्यात त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. गावातील ग्रामस्थांना एकत्र करून त्यांनी ही शाळा उभी केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नाणीज परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आणि अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले.
श्री. कात्रे यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. शिक्षणाला जीवनाचे ध्येय मानणारे आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे अभ्यासू शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षक, मार्गदर्शक, उत्तम व्यवस्थापक आणि समाजातील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी असंख्य लोकांच्या आयुष्यावर अमिट ठसा उमटवला.
त्यांच्या दूरदृष्टीतून आणि कठोर परिश्रमातून नाणीज शिक्षणोत्तेजक मंडळाची उभारणी झाली. शिक्षणाबद्दलची त्यांची निष्ठा, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम आणि समाजासाठीची तळमळ सदैव प्रेरणादायी राहील.
त्यांच्या पश्चात ३ मुली, जावई, नातू, मुलगा डॉ. नितीन कात्रे, सून तसेच दोन नाती असा परिवार आहे. डॉ. नितीन कात्रे हे ठाण्यातील प्रख्यात डॉक्टर असून त्यांची सून व नात देखील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची मोठी मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहे.
सरांच्या निधनाची बातमी समजताच हजारो माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. नाणीज दशक्रोशीतील त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सदैव सर्वांच्या स्मरणात राहील

