(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींवर अंकुश आणण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रभावी कारवाई करत ४२ हजार रुपये किमतीचा ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ जप्त केला असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीबाबत गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त होत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, २७ एप्रिल रोजी दुपारी सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे व त्यांचे सहकारी शहरात गस्त घालत असताना पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागील गगनगिरी मठ रस्त्यावर एक इसम संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याची चौकशी करून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ब्राऊन हेरॉईन सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या कारवाईत राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (वय ३०, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) याच्याकडून सुमारे ३.५ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन सदृश पदार्थ व त्यासाठी वापरण्यात आलेली साहित्य जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ४२ हजार रुपये आहे.
या प्रकरणी संबंधिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (क्र. १३७/२०२६) करण्यात आला असून एनडीपीएस ॲक्ट १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २१(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे तसेच दिपक साळवी, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, अमित पालवे आणि निलेश शिंगवे या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

