(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय आता नव्या स्वरूपात वाचकांसमोर उभे राहणार आहे. विजयादशमी (२ ऑक्टोबर) ते दीपावली पाडवा या कालावधीत वाचनालयाचे नूतनीकरण पूर्ण होऊन ते अद्ययावत स्वरूपात सुरू होईल, असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
नव्या रूपात ग्रंथ मांडणी केली जाणार असून पुस्तकांना बारकोडिंग करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. निवडक वाचकांना थेट ग्रंथदालनात प्रवेश देऊन पुस्तक निवडीचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे. वाचन कक्षातील आसन व्यवस्थेमुळे प्रत्येक वाचकाला शांतपणे बसून सुमारे ५०० पुस्तकांपर्यंत हाताळता येईल, अशी रचना करण्यात येत आहे.
वाचनालयात नवे पुस्तके खरेदी करण्यासाठी दर्शनी भागात स्वतंत्र काउंटर ठेवण्याची योजना आहे. तसेच ज्ञानपीठ सन्मानप्राप्त लेखकांची माहिती व साहित्यकृतींसाठी विशेष दालन, नवीन ग्रंथ उपलब्धतेची माहिती देणारा डिजिटल बोर्ड, तसेच मराठी साहित्यविश्वातील अजरामर ग्रंथांची ठळक मांडणी केली जाणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तसेच त्यांच्यावरील साहित्य, स्वामी स्वरूपानंदांचे साहित्य आणि बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन अशी विविध वैशिष्ट्ये नव्या वाचनालयात असतील. सध्या असलेल्या १ लाख १५ हजार ग्रंथसंपदेचा विस्तार २ लाख ग्रंथांपर्यंत करण्याचा संकल्प आहे. तसेच ई-रीडिंग सुविधा उपलब्ध करून वाचनालय अधिक आधुनिक स्वरूपात सज्ज करण्याचे काम सुरू असून, लवकरच वाचकांसाठी हे केंद्र खुले होणार असल्याचे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.

