(मंडणगड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
मे महिन्याच्या सुट्टीसाठी मुंबईहून आपल्या मूळ गावी आलेल्या तरुणाचा तुळशी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली. अमित बाळकृष्ण शिगवण (वय ३२, रा. तुळशी गणेशवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धरण परिसरातील सुरक्षाव्यवस्थेच्या अभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शिगवण हे मुंबई येथे वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी ते काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी तुळशी गणेशवाडी येथे आले होते. रविवारी (दि. १० मे) सायंकाळी चारच्या सुमारास ते कुटुंबीयांसह तुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी किनाऱ्यालगत पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते अचानक खोल पाण्यात गेले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक नितीन गवारे, बीट अंमलदार दत्ताराम बाणे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, धरणाच्या कालव्याजवळील खोल पाणी, चिखल आणि प्रवाहामुळे शोधकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
अखेर सोमवारी (दि. ११ मे) सकाळी महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. प्रशांत साळुंखे आणि त्यांच्या पथकाने अनेक तास शोधमोहीम राबवल्यानंतर अमित शिगवण यांचा मृतदेह चिखलात अडकलेल्या अवस्थेत शोधून काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे पाठविण्यात आला. या घटनेनंतर तुळशी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, तालुक्यातील तिडे, भोळवली, चिंचाळी, पंदेरी आणि तुळशी या धरण परिसरांमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई वाढल्याने अनेक ग्रामस्थ आंघोळीसाठी किंवा पाण्याच्या वापरासाठी धरणांकडे जातात. मात्र, धरणातील खोल पाणी, गाळ आणि चिखल यांची माहिती नसल्याने जीवितास धोका निर्माण होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
धरण परिसरात सुरक्षा रक्षक, इशारा फलक अथवा बचाव साधनांची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने यापूर्वीही अनेकांना जीव गमवावा लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रत्येक दुर्घटनेनंतर काही काळ चर्चा रंगते; मात्र ठोस उपाययोजना मात्र होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

