(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत हत्यांच्या घटना वाढू लागल्या असून जिल्हा हादरून उठला आहे. नुकत्याच एका मुलाने आईचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबाघाट परिसरात बेपत्ता तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह फेकून दिल्याची थरारक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) ही तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता होती. गेल्या वर्षभर ती रत्नागिरीतील एलआयसी कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत होती. तिचा शोध सुरू असताना कुटुंबीयांनी संशयाचा बोट दुर्वास दर्शन पाटील (वय २५) या तरुणावर ठेवले होते. दुर्वास हा रत्नागिरीतील एका बिअर बारवाल्याचा मुलगा असून पोलिसांनी चौकशीत दबाव आणताच त्यानेच खून केल्याची कबुली दिली.
भक्तीचा खून करून तिचा मृतदेह आंबाघाटातील दरीत फेकण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी व शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ट्रेकर्सच्या मदतीने हा मृतदेह शोधून बाहेर काढला. सायंकाळी उशिरा भक्तीचा मृतदेह मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
हत्येचा कट सायली बारमध्ये रचला!
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी दुर्वास पाटील याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सायली देशी बारमध्ये हत्येचा कट रचला. त्यानंतर नियोजनबद्धरीत्या भक्तीची हत्या करून तिचा मृतदेह आंबाघाट परिसरात नेऊन फेकण्यात आला. या प्रकरणी भक्तीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025, कलम 138 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दुर्वास पाटील व त्याचे साथीदार ताब्यात असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे.
दुर्दैवी मृत्यूने घरच्यांवर दुःखाचा डोंगर
भक्तीच्या अकस्मात व दुर्दैवी मृत्यूमुळे मयेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी शहर व परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत पुढील तपास सुरू केला आहे.

