(मंडणगड)
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे, ता. मंडणगड येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सहाय्यक श्रीमती मेघना मंगेश आंब्रे या नियत वयोमानानुसार ३० जून रोजी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. सलग ३९ वर्षे त्यांनी आरोग्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल सहकारी व अधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला.
या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावंडे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवतारे यांच्यासह मंडणगड तालुक्यातील आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी श्रीमती आंब्रे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कंकाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. काटे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी, श्रीमती आंब्रे यांना शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांच्या निवासस्थानी सन्मानपूर्वक सोडण्यात आले.

