(मंडणगड)
तालुक्यातील नारगोली टेकडी घाटात मध्यरात्री २.४५ वाजता एसटी बसला झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याने मोठ्या जीवितहानीचा धोका टळला आहे.
ही एसटी बस वाकडा – आंजर्ले – परळ पालवणी मार्गे प्रवास करत होती. घाटातील उतारावर बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीला वेग असल्याने बस रस्ता सोडून खालील बाजूच्या झाडाझुडपात अडकून पडली.
अपघातात चालक व वाहक दोघेही जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवरही उपचार सुरू आहेत. बस झाडाझुडपात अडकल्यामुळे गंभीर दुर्घटना टळली, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होती.
घटनास्थळी पोलीस व एसटी प्रशासनाने पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे नारगोली घाटातील रस्त्यांची सुरक्षितता तसेच एसटी बसच्या तांत्रिक देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

