(दापोली/ प्रतिनिधी)
आगामी जनगणनेत आदिवासी समाजासाठी स्वतंत्र धर्म कोड जाहीर करण्यात यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. या वेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्य महिला प्रतिनिधी चंद्रभागा पावरा, अमोल पावरा, दत्तात्रय वाघमारे आदी उपस्थित होते.
संघटनेने दिलेल्या निवेदनात आदिवासी समाज हा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अथवा अन्य कोणत्याही धर्माचा नसून तो मूलतः निसर्गपूजक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आदिवासी समाज जल, जंगल, जमीन, डोंगर आणि निसर्गातील विविध घटकांची पूजा करतो. त्यांची संस्कृती, परंपरा, भाषा, वेशभूषा आणि जीवनशैली स्वतंत्र स्वरूपाची असून ती जपण्यासाठी स्वतंत्र ओळख आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील जनगणनेत आदिवासींची स्वतंत्र नोंद केली जात होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर आदिवासी समाजाला विविध धर्मांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही प्रवृत्ती आदिवासींना जबरदस्तीने हिंदू म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सन २०२६ च्या जनगणनेत कॉलम क्रमांक ७ मध्ये आदिवासी समाजासाठी स्वतंत्र धर्म कोडचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

