( मुंबई )
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी हक्कभंग समितीसमोर हजर झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आपल्या वक्तव्यातील एकही शब्द असंसदीय नसल्याचा दावा करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली.
सोमवारी विधान भवनात झालेल्या सुनावणीत सुषमा अंधारे यांनी हक्कभंग समितीसमोर आपली बाजू मांडली. कुणाल कामराने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित विडंबनात्मक कविता सादर केली होती. त्या व्हिडीओला पाठिंबा देत अंधारे यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती.
याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीस अनुपस्थित राहिलेल्या अंधारे यावेळी स्वतः समितीसमोर उपस्थित राहिल्या. साक्ष नोंदवल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “शपथ घेण्यासाठी मला गीता देण्यात आली होती. मात्र, मी संविधानावर शपथ घेण्याची मागणी केली. त्यानंतर संविधान देण्यात आलं आणि त्यावर शपथ घेऊन मी माझी साक्ष नोंदवली.”
अंधारे यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी स्टुडिओ फोडण्याच्या घटनेविरोधात भूमिका घेतली होती. “मी स्टुडिओ तोडणाऱ्यांबाबत बोलले. त्यातील एकही व्यक्ती विधिमंडळ सदस्य नाही,” असे त्या म्हणाल्या.
हक्कभंग समितीकडून माफी मागण्याबाबत विचारणा करण्यात आल्याचे सांगत त्यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. “मी माफी मागणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भूमिकेतून मी कुणाल कामराला पाठिंबा दिला,” असे अंधारे म्हणाल्या. तसेच, “माझ्या वक्तव्यातील एकही शब्द संसदीय समितीच्या असंसदीय शब्दांच्या यादीत नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, हक्कभंग समितीचे अध्यक्ष तथा भाजपा नेते प्रसाद लाड यांनी अंधारे यांच्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली. “समितीकडून त्यांना 22 ते 23 प्रश्न विचारण्यात आले. मात्र, अनेक प्रश्नांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली,” असा आरोप त्यांनी केला. समितीकडून वकिलामार्फत उत्तर सादर करण्याचा पर्यायही देण्यात आला होता, मात्र अंधारे यांनी त्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
चौकशीदरम्यान सुषमा अंधारे यांनी आपण संवैधानिक अधिकारांच्या चौकटीत राहूनच कविता शेअर केल्याचा दावा केला. तसेच, “मी कुणाल कामराला वैयक्तिकरित्या ओळखत नाही,” असेही त्यांनी समितीसमोर नमूद केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात गेल्या वर्षी मार्चमध्ये झाली होती. कुणाल कामराने ‘नया भारत’ या शीर्षकाखाली एक विडंबनात्मक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ‘भोली सी सूरत’ या गाण्याच्या चालीवर सादर करण्यात आलेल्या या गाण्यात ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी’ अशा ओळींचा वापर करण्यात आला होता. गाण्यात थेट नाव नसले तरी ते एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित असल्याची चर्चा रंगली होती. व्हिडीओमध्ये ‘गद्दार’ शब्दाचाही उल्लेख करण्यात आला होता.
एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीनंतर कुणाल कामरानेही माफी मागण्यास नकार दिला होता. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्याने “पश्चात्ताप किंवा खेद नाही” असे स्पष्ट करत माफी मागितल्यास ती मनापासून नसेल, असे म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध संसदीय विशेषाधिकार हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, हक्कभंग समितीच्या अंतिम अहवालाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

