(पुणे/मुंबई)
नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढू लागला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने राज्यातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांत पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत असून, दिवसा काही काळ ऊबदारपणा जाणवला तरी थंडीचा प्रभाव कायम आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार डिसेंबरअखेर वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलाचा थेट परिणाम तापमानावर झाला आहे. रविवारी राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे होते. कोरड्या हवामानासोबतच उत्तर भारतात सक्रिय असलेल्या थंडीच्या लाटेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. त्यामुळे पहाटे कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि कामगार वर्गाला तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे.
दाट धुक्याचा इशारा
हवामान खात्याने उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये एक जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. या हवामान बदलाचा परिणाम राज्होयावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील काही भागांत पहाटे धुक्याची स्थिती निर्माण होऊ शकते. महामार्गांवर आणि ग्रामीण भागांत वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाडा, विदर्भात आणखी थंडी वाढणार
मराठवाड्याच्या अंतर्गत भागांमध्ये, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुण्यासह मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कमी होणार नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. विदर्भात पुन्हा एकदा किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची चिन्हे आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
पुण्यात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून सकाळच्या वेळेत विरळ धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या उर्वरित भागांतही पहाटे आणि संध्याकाळनंतर तापमानात घट होत राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

