(रत्नागिरी / प्रतिनिधी)
निवळी-जयगड मार्गावरील जाकादेवी येथे सोमवारी दुपारी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एका जखमीला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चंद्रकांत लक्ष्मण डांगे (वय ४२) आणि आयुष बाळकृष्ण डांगे (वय १४, रा. हातखंबा डांगेवाडी) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत आणि आयुष डांगे हे सोमवारी टेम्पोमधून निवळी-जयगड मार्गाने गणपतीपुळेच्या दिशेने जात होते. दुपारच्या सुमारास जाकादेवी परिसरात वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याकडेला पलटी झाला. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आयुष याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते. अपघातप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

