(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील कोतवडे सनगरेवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये सोमवारी दुपारी तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत दोन्ही गटांतील सात ते आठ जण जखमी झाले असून काहींना कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर अन्य जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रसाद गणपत राणे (४३), प्रदीप श्रीकृष्ण राणे (४०), सुजाता संजय करडे (५०), समीक्षा प्रसाद राणे (४०), गणपत लक्ष्मण राणे (७५, सर्व रा. कोतवडे सनगरेवाडी) तसेच दुसऱ्या गटातील सरिता दशरथ बारगोडे (७५), राकेश बारगोडे, आयुष बारगोडे आणि राजेश बारगोडे (रा. कोतवडे) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राणे कुटुंबीयांच्या घरी १३ मे रोजी विवाहसोहळा होणार असून त्यासाठी रस्त्यावर प्रकाशयोजनेचे काम सुरू होते. याच प्रकाशयोजनेवरून राणे आणि बारगोडे कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

