( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
आपल्या वाडीतील बहिणीच्या लग्नासाठी आनंदाने देवरुखकडे गेलेले हातखंबा गावातील नातेवाईक परतीच्या प्रवासात असतानाच काळाने घाला घातला. पांगरी येथील धोकादायक वळणावर (रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण हातखंबा गाव शोकसागरात बुडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा येथील मुलीचा विवाह देवरुख भागातील वराशी होता. या लग्न सोहळ्यासाठी मुलीकडील नातेवाईक गाड्या भरून देवरुख येथे गेले होते. लग्न समारंभ आनंदात पार पडला. मुलीकडील तिघे तरुण जेवण करून परतीच्या प्रवासाला निघाले होते. देवरुख बावनदी मार्गावरील पांगरी येथील अवघड वळणावर दुचाकी (गाडी नंबर MH. 47. V. 7492 ) आली असता नियंत्रण सुटून दुचाकी मोरीच्या कठड्यावर जोराची आदळली आणि तिघेही गाडीवरून फेकले जाऊन खोल दरीत पडले. या अपघातामध्ये तिघांच्या ही डोक्याला गंभीर मार बसल्याने सुमित विलास कांबळे (वय ३५, रा. हातखंबा-बौद्धवाडी, रत्नागिरी) आणि विकास काशीराम कांबळे (वय ३८, रा. हातखंबा-बौद्धवाडी, ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास चंद्रकांत कांबळे हे गंभीर जखमी अवस्थेत होते. अपघात पाहताच स्थानिक नागरिक, वाहनचालक यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. हातखंबा येथील जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह व जखमी विकास चंद्रकांत कांबळे यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात वैद्यकीय अधीक्षक सांगवीकर, डॉ. मनोहर कदम ( सर्जन) डॉ. जमशेर बाबू यांच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत.

या तरुणांच्या अपघाताची माहिती हातखंबा गावात पोहोचताच अवघा परिसर सुन्न झाला. प्रत्येकाच्या परिचयातील, हसतमुख आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणाऱ्या या तरुणांबाबत अशी दुर्दैवी घटना घडेल, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. क्षणातच गावभर हळहळ आणि अविश्वासाचे वातावरण पसरले. मात्र परिपूर्ण माहिती मिळताच काही बांधव तातडीने अपघातस्थळी धावले, तर काहीजण थेट रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. हातखंबा बौद्धवाडीतील नागरिकांनीही मोठ्या संख्येने रुग्णालय गाठले. काही वेळातच रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी, वेदना आणि अनामिक भीती स्पष्टपणे दिसत होती. या अपघाती निधनाने हातखंबा ग्रामस्थांच्या मनाला खोलवर चटका बसला आहे. आनंदाच्या प्रसंगातून परतताना घडलेली ही शोकांतिका अनेकांना अंतर्मुख करून गेली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोघांवर दिनांक २७ एप्रिल रोजी हातखंबा बौद्धवाडी येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झाले असून, अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पांगरी येथील ते वळण धोकादायक असल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांच्या तोंडून वारंवार ऐकू येत होती. या वळणावर पूर्वीही किरकोळ ते गंभीर अपघात घडल्याच्या आठवणी स्थानिकांकडून सांगितल्या जात आहेत. या धोकादायक वळणावर वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
एकाच क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात
आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणाने भरलेला विवाहसोहळा क्षणात शोकांतिका ठरला. नव्या नात्यांच्या साक्षीने फुललेला आनंद तीन तरुणांच्या परतीच्या प्रवासात काळाच्या निर्दयी झटक्याने विरून गेला. काही वेळापूर्वी हसत-खेळत, गप्पागोष्टीत रमलेले चेहरे अचानक कायमचे निःशब्द झाले, ही वस्तुस्थिती बौद्धवाडीतील नागरिकांच्या मनाला अस्वस्थ करून जात आहे. एकाच क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात झाले आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या आठवणींमध्ये मिसळलेला हा दुःखद प्रसंग अनेकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला आहे. उत्सवाच्या क्षणांना दुःखाची किनार लाभल्याने गावातील वातावरण आजही हळहळ आणि वेदनेने भारलेले आहे.
संपूर्ण परिसराला मोठा धक्का
सुमित कांबळे हा एका नामांकित कंपनीत ऑफिसबॉय म्हणून कार्यरत असून आपल्या कष्टाळूपणा आणि जबाबदारीने ओळख निर्माण करणारा तरुण होता. तर विकास कांबळे हा परिसरात अत्यंत कुशल आणि विश्वासार्ह चारचाकी चालक म्हणून नावाजलेला होता. त्याच्या शांत स्वभावामुळे आणि अचूक वाहनचालनामुळे अनेकांचा तो आवडता ठरला होता. या दोघांच्या अकाली निधनामुळे केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण बौद्धवाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असून, त्यांच्या आठवणी कायमच जिवंत राहणार आहेत अशा शब्दात आपल्या भावना येथील तरुण व्यक्त करत आहेत.

