(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील MIDC भागातील अंतर्गत रस्त्यावर तसेच रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते खेडशी भागातील मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या जनावरांचे रस्त्यावर बसून राहणे हे अपघातांना निमंत्रण देत असून, वाहनचालकांसाठी ही एक गंभीर समस्या ठरत आहे.
गेल्या काही काळात अशा मोकाट गुरांमुळे वाहनांना अचानक अडथळा निर्माण होऊन अपघात घडल्याच्या घटना समोर येत आहेत. अनेक वेळा वाहनचालक या जनावरांना टाळण्याचा प्रयत्न करताना रस्त्यावर नियंत्रण गमावतात. काही प्रसंगी जनावरे थेट वाहनाच्या धडकेत येऊन त्यांचा मृत्यू होतो. परिणामी, जीवितहानी तर होतेच, शिवाय वाहनचालकांवर विनाकारण गुन्हेही दाखल होतात. यामागे दोष वाहनचालकांचा असतोच असे नाही. अंधारात रस्त्यावर बसलेली गुरे सहज लक्षात येत नाहीत. विशेषतः प्रकाश कमी असलेल्या ठिकाणी या जनावरांची उपस्थिती थेट जीवावर बेतू शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
संबंधित ग्रामपंचायतींनी व नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांसाठी विशेष तात्पुरते निवाऱ्यांची व्यवस्था करावी, तसेच जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचीही कार्यवाही त्वरित सुरू करावी. स्थानिक नागरिकांनीदेखील सार्वजनिक रस्त्यांवर गुरे मोकाट सोडू नयेत, यासाठी जनजागृती केली जाणे गरजेचे आहे.
अपघात घडून गेल्यानंतर पोलीस कारवाई व चौकशी करण्यात वेळ घालवण्यापेक्षा, अपघात टाळण्यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हा शहाणपणाचा मार्ग ठरेल. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे.

