( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील मिरजोळे येथील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या ‘आदिशक्ती अभियान’ अंतर्गत मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतीसाठी आदिशक्ती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्या सिमरन सुभाष जाधव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावातील महिला वर्गात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या अभियानाचा उद्देश महिलांना त्यांच्या अधिकार, कर्तव्ये व हक्कांविषयी मार्गदर्शन करणे, तसेच त्यांना आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी या समितीमार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सिमरन जाधव म्हणाल्या, आदिशक्ती अभियानाच्या माध्यमातून गावातील महिलांना त्यांच्या हक्कांसाठी सजग करण्यासोबतच त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्याचे प्रयत्न केले जातील. समाजातील प्रत्येक महिलेला या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन मी करते. यामुळे गावातील महिला जीवनात नवे परिवर्तन घडवू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमावेळी समितीचे इतर सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिमरन जाधव यांच्या निवडीमुळे गावातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महिलांना प्रगतीस नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

