( नवी मुंबई )
खारघर परिसरात चाकूचा धाक दाखवत 57 तोळे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात खारघर पोलिसांना मोठे यश आले आहे. धक्कादायक म्हणजे, फिर्यादीच्या जवळच्या मित्रानेच पत्नी, मेहुणा आणि साथीदारांसोबत मिळून ही लूट आखल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी लुटलेले सोन्याचे दागिने, शस्त्रे आणि वाहनं जप्त केली आहेत.
घराजवळच चाकू हल्ला, 57 तोळे सोनं लंपास
22 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी सुशांत नामदेव मोरे हे बेलापूरमधील एका हॉटेलमध्ये जेवण करून मित्रांसह घरी परतत होते. खारघरमधील घराजवळ पोहोचताच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मित्रांवर अचानक हल्ला केला. झटापटीदरम्यान फिर्यादीच्या हातावर चाकूने वार करण्यात आला. त्यानंतर चालकाकडे असलेली 57 तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हिसकावून आरोपी फरार झाले. या धाडसी लुटीमुळे खारघर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य उघड
घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच या लुटीचा कट रचला होता. त्याने पत्नी, मेहुणा आणि गावाकडील साथीदारांच्या मदतीने संपूर्ण प्लॅन आखल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.
सांगली ते पंढरपूर; पोलिसांचा मोठा सापळा
तपासादरम्यान आरोपी सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुख्य आरोपी पालखी सोहळ्याच्या गर्दीत मिसळून फिरत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी पंढरपूर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 57 तोळे सोन्याचे दागिने, चाकू, मारुती स्विफ्ट कार आणि रायडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दोन आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक डमाळे करत आहेत.

