( खालापूर / रायगड )
पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगचा आनंद घेण्यासाठी माथेरानच्या डोंगराळ भागात आलेल्या पनवेलमधील 19 वर्षीय तरुणाचा तब्बल 500 ते 600 फूट खोल दरीत पडून गंभीर अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आंबेवाडी परिसरात हा थरार घडला. स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि बचाव पथकाच्या धाडसी प्रयत्नांमुळे तब्बल तीन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव वीरा स्वामी (वय 19, रा. सुकापूर, पनवेल) असे आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक पण उपचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे.
पाच मित्रांसोबत ट्रेकिंगला आला होता
प्राथमिक माहितीनुसार, वीरा स्वामी हा आपल्या पाच मित्रांसोबत माथेरान परिसरातील आंबेवाडी येथे पावसाळी ट्रेकिंगसाठी आला होता. डोंगररांगांमधील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळला. घटनेनंतर त्याच्या मित्रांनी तातडीने आरडाओरडा करून मदत मागितली. परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
मुसळधार पाऊस, निसरडा मार्ग आणि अंधार; तरीही बचावकार्य सुरूच
अपघाताची माहिती मिळताच आंबेवाडी आणि ताडवाडी येथील स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता दरीत उतरून जखमी तरुणाचा शोध सुरू केला. मुसळधार पाऊस, निसरडी पायवाट, दाट धुके आणि खोल दरी यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. मात्र, स्थानिकांनी धाडस दाखवत जखमी वीरापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
तीन तासांची थरारक रेस्क्यू मोहीम
जखमी तरुणाला सुरक्षितपणे वर आणण्यासाठी तब्बल तीन तास अथक प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, माहिती मिळताच खालापूर पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत परिसरात अंधार पसरला होता. टॉर्चच्या प्रकाशात आणि दोरांच्या सहाय्याने जखमी तरुणाला काळजीपूर्वक दरीतून बाहेर काढण्यात आले. डोंगराच्या पायथ्याशी आधीच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती. जखमी युवकाला तातडीने खांडेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. .
पावसाळी ट्रेकिंग करणाऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पावसाळ्यात डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस, निसरडे कडे, खोल दऱ्या आणि कमी दृश्यमानता यामुळे अशा ठिकाणी अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. ट्रेकिंगसाठी जाणाऱ्यांनी अधिकृत मार्गांचा वापर करावा, हवामानाचा अंदाज तपासावा, सुरक्षा साहित्य सोबत ठेवावे आणि स्थानिकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि बचाव पथकाने दाखवलेल्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या तत्परतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

