( नवी दिल्ली )
आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू कुटुंबांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) म्हणजेच आयुष्मान भारत योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळतात. मात्र, आयुष्मान कार्डचा वापर वर्षभरात किती वेळा करता येतो, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. आता केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे.
५ लाखांपर्यंत उपचार कितीही वेळा घेता येणार
आयुष्मान भारत योजनेत उपचारांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. लाभार्थी वर्षभरात गरजेनुसार अनेक वेळा रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेऊ शकतो, मात्र एकूण खर्चाची मर्यादा ५ लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच, एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या उपचारांसाठी मिळून ५ लाख रुपये खर्च होईपर्यंत कॅशलेस सुविधा उपलब्ध राहते. ५ लाखांची मर्यादा ओलांडल्यानंतर पुढील खर्च रुग्णाला स्वतः करावा लागतो.
खासगी रुग्णालयातही कॅशलेस उपचार
या योजनेअंतर्गत यादीत समाविष्ट असलेल्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये मोफत आणि कॅशलेस उपचार घेता येतात. त्यामुळे मोठ्या शस्त्रक्रिया, गंभीर आजारांवरील उपचार आणि रुग्णालयातील खर्चाचा ताण गरीब कुटुंबांवर येत नाही.
आयुष्मान कार्ड कसे काढाल?
आयुष्मान कार्डसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे. तिथे पात्रता तपासली जाते. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी होते. अर्ज मंजूर झाल्यानंतर काही वेळेतच कार्ड डाउनलोड करता येते.
कोण पात्र, कोण अपात्र?
ही योजना खास करून गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आहे.
- नियमित आयकर भरणारे
- संघटित क्षेत्रातील कर्मचारी
- पीएफ कपात होणारे पगारदार
- सरकारी नोकरीतील कर्मचारी
- ईएसआयसी (ESIC) लाभार्थी
हे सर्व या योजनेसाठी अपात्र मानले जातात.
गरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा
आयुष्मान भारत कार्डमुळे आरोग्यसेवेचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळत असल्याने लाखो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. आजारपणात आर्थिक ओझं न पडता उपचार मिळावेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 31.01.2026 पर्यंत कार्डधारकांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांतून अधिकृतपणे 1.15लाख कोटी रुपये खर्च करून 5.77 कोटी रुग्णांना रुग्णालयांतून प्रवेश देण्यात आले. गेल्या पाच वर्षांत (म्हणजे एप्रिल 2020 ते जानेवारी 2026 या कालावधीत), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत अंदाजे 35.69 कोटी आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत.

