( नवी दिल्ली )
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एका रात्रीत मोठा बदल पाहायला मिळाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर्सच्या खात्यांवरील लाखो फॉलोअर्स अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया युजर्स या घटनेला आता “Great Purge of 2026” असे नाव देत आहेत. या कथित मोठ्या क्लीनअप मोहिमेमुळे विराट कोहली, क्रिस्टियानो रोनाल्डो, प्रियंका चोप्रा यांच्यासह अनेक जागतिक सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
टेलर स्विफ्ट ते कायली जेनर; लाखो फॉलोअर्स गायब
अहवालानुसार, Taylor Swift हिने जवळपास 50 लाख फॉलोअर्स गमावले आहेत. तर Ariana Grande आणि BTS यांच्या खात्यांवरूनही सुमारे 70 लाख फॉलोअर्स कमी झाल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलं नाव म्हणजे Kylie Jenner. तिच्या खात्यावरून तब्बल 1.5 कोटी फॉलोअर्स कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय Selena Gomez यांच्याही फॉलोअर्समध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे.
Meta ची बनावट खात्यांविरोधातील मोठी मोहीम?
Meta कंपनीने इन्स्टाग्रामवरील बनावट, स्पॅम आणि बॉट अकाउंट्स हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडिया तज्ज्ञांच्या मते, अनेक सेलिब्रिटींच्या खात्यांवर मोठ्या प्रमाणावर निष्क्रिय किंवा कृत्रिम फॉलोअर्स असतात. त्यामुळे अशा खात्यांमध्ये सर्वाधिक घट दिसून आली. व्हायरल पोस्टनुसार, एकाच वेळी 5 कोटींपेक्षा जास्त बनावट खाती हटवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मेटाकडून अद्याप या आकड्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. कंपनीने यापूर्वीही वेळोवेळी स्पॅम आणि फेक अकाउंट्स हटवण्याच्या कारवाया केल्याचे सांगितले होते.
सोशल मीडियावर ‘Great Purge 2026’ ट्रेंड
फॉलोअर्स अचानक कमी झाल्यानंतर सोशल मीडियावर “Great Purge 2026” आणि “Bot Cleanup” हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेक युजर्सनी स्क्रीनशॉट शेअर करत ही इन्स्टाग्रामच्या इतिहासातील सर्वात मोठी क्लीनअप मोहीम असल्याचा दावा केला. या घटनेनंतर सोशल मीडियावरील खऱ्या लोकप्रियतेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. लाखो फॉलोअर्स असलेली सर्व खाती खरोखरच सक्रिय आणि वास्तविक युजर्सची आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
प्लॅटफॉर्म अधिक विश्वासार्ह होणार?
अनेक युजर्सच्या मते, ही मोहीम आवश्यक होती आणि त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनेल. मात्र, काहींनी या प्रक्रियेत काही खरी खाती चुकीने हटवली गेली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान, इन्स्टाग्राम आणि मेटा आता बनावट एंगेजमेंट, बॉट नेटवर्क आणि फेक फॉलोअर्सविरोधात अधिक कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

