(पुणे)
जागतिक स्तरावर IT क्षेत्र मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात असताना महाराष्ट्रातील पुणे शहर नव्या आर्थिक क्रांतीचे केंद्र बनत आहे. जगातील सर्वात मोठे GCC (ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर) हब म्हणून पुण्याची वेगाने ओळख निर्माण होत असून, भविष्यात IT सेक्टरला टक्कर देणारा मोठा रोजगार पर्याय म्हणून GCC क्षेत्र उदयास येत आहे. सध्या पुण्यात ३६० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली GCC कार्यालये सुरू केली असून पुढील काही वर्षांत हा आकडा ५०० पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील GCC गुंतवणुकीबाबत महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे २५ टक्के गुंतवणूक पुण्यात होत आहे. जागतिक स्तरावर पुण्याची ओळख ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हब म्हणून निर्माण होत असून यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
GCC हब म्हणजे नेमकं काय?
GCC म्हणजे “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर”. मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) दुसऱ्या देशात तंत्रज्ञान, संशोधन, डेटा अॅनालिटिक्स, वित्तीय सेवा, आयटी, इंजिनिअरिंग आणि बिझनेस ऑपरेशन्ससाठी जी केंद्रे उभारतात, त्यांना GCC हब म्हटले जाते. जगभरातील अनेक आघाडीच्या कंपन्या भारताला आपले संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून पसंती देत आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही GCC क्षेत्रातील प्रमुख शहरे बनत आहेत.
महाराष्ट्र सरकारचे ‘GCC धोरण 2025’
महाराष्ट्र सरकारने GCC क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘GCC धोरण 2025’ जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात ४०० नवीन GCC केंद्रे सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० हजार ६०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. सरकारचे उद्दिष्ट २०३० पर्यंत राज्यात किमान ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे असून त्यापैकी सुमारे ४ लाख नोकऱ्या पुण्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. GCC क्षेत्रामुळे IT, इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, फायनान्स, रिसर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.
कंपन्यांना विशेष सवलती
पुण्यात GCC केंद्र सुरू करण्यास इच्छुक कंपन्यांना महाराष्ट्र सरकारकडून कर सवलत, जमीन, कार्यालयीन जागा, पाणी-वीज सुविधा, ‘सिंगल विंडो’ मंजुरी प्रणाली, संशोधन व विकासासाठी प्रोत्साहन तसेच पेटंटसाठी अनुदान दिले जात आहे. सध्या पुणे भारतातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग, रिसर्च, डेटा सेंटर आणि IT सेवा केंद्रांपैकी एक बनले आहे. जगातील अनेक मोठ्या IT कंपन्या, बँका, फायनान्स आणि विमा क्षेत्रातील (BFSI) कंपन्यांनी पुण्यात आपली कार्यालये सुरू केली आहेत.
IT क्षेत्रातील मंदी आणि नोकरकपातीच्या पार्श्वभूमीवर GCC क्षेत्र भविष्यातील सर्वात मोठा रोजगार पर्याय ठरू शकतो, अशी चर्चा उद्योग क्षेत्रात सुरू झाली आहे.

